
रत्न अर्थ व स्वरुप
रत्न
हे आपल्याला पृथ्वीच्या पोटातून मिळतात.रत्न हे मूळ पृथ्वीतत्वात मोडते. परंतु विशिष्ट अशा अणूरेणूंच्या ठेवणीमुळे त्यातले मुलभूत गुणधर्म जाऊन किंवा मूळ स्वभाव जाऊन प्रकाशाच्या माध्यमातून आकाश तत्वास जोडले गेल्यामुळे त्याला दैवी गुण पाप्त होतात. रत्न हे प्रकाशाचे बीज आहे. व्यक्तीचे प्रकाशाशी,भवनाचे चैतन्याशी व मनाचे विश्वात्मक आत्म्याशी तत्काळ नाते जोडता येते. रत्नाची उत्पत्ती हा दुर्मिळ योग आहे. पृथ्वीच्या उदरात विशिष्ट क्षार, विशिष्ट योगावर जेव्हा संमिलित होतात तेव्हा त्यात प्रकाशाचे सामर्थ्य जन्म घेते.
यामध्ये कंपने,लहरी, घ्वनी व प्रकाश या चारही माध्यमांचा संस्कार अंतर्भूत असतो. निसर्गाच्या अपार उर्जेशी ज्या गोष्टींशी मैत्रीसंबंध तयार होतात तिथे उर्जेचा संजीवक संस्कार आपोआपच होतो. म्हणूनच पौर्वात्य, सर्वच शास्त्रात रत्न उपाय हा सर्वश्रेष्ठ मानला आहे.
प्राचीन काळापासून आपल्या भारतात अनेक राजे, महाराजे हिरे, रत्ने जडजवाहिरे यांचा वापर करत असत. यांचा वापर विशिष्ट कार्यासाठी, ग्रहांसाठी ,विशिष्ट कालखंडासाठी ते करत असत. निसर्गात तयार होणार्या या नैसर्गिक रत्नांचा निसर्गाशी संपर्क साधून पंचमहाभूतांचे संतुलन करता येते.
आचार्य मयासूर व मानसास ऋषी यांनी अनुक्रमे मयमतम व मानसारम या ग्रथांत रत्नांचा सविस्तर अभ्यास केलेला दिसून येतो. अष्टदिशांचा ग्रहगत व पंचमहाभूतात्मक गुणांचा विचार करून रत्नांची जोडणी केलेली असल्यामुळे उर्जेच्या मंडलाकार प्रवाहास श्रेष्ठ गती प्राप्त होते. त्यामुळे रत्नउपचाराने व्यक्तीस स्थैर्य,क्षेम, आयु ,मांगल्य व कल्याण प्राप्त होऊ शकतात. रत्न उपचार विशिष्ट मुहुर्तावर केल्यास श्रेष्ठ कंपने ,दिव्य लहरी, प्रणव ध्वनी व आत्मप्रकाश आपल्याला अनुभवास येतात.
विशिष्ट तत्वोदयासाठी रत्नांचा उपयोग भूगर्भात जमिनीखाली पुरून करावा तर तत्वक्षयासाठी रत्नांचा उपयोग करताना भिंतीवर किंवा घराबाहेर करावा. रत्नमाध्यमांचा उपयोग करताना वातावरणशास्त्राचा महत्वाचा संदर्भ रत्नयोजना करण्याआधी लक्षात घेणे आवश्यक आहे.